पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी
प्रस्तावना:-
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन -हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप :-
- इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
- सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.
- पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.
- सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्याअंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
- सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्याआहेत.
- सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.
- पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
पुनर्रचित सेतू अभ्यासाचाअंमलबजाणी कालावधी :-
१.पूर्व चाचणी
दि. १७ ते १८ जून, २०२२.
२. ३० दिवसांचा सेतू अभ्यास
दि. २० जून ते २३ जुलै,२०२२.
3.उत्तर चाचणी
दि. २५ ते २६ जुलै, २०२२.
सेतु अभ्यास पेपर लिंक.
https://www.maa.ac.in/index.php?tcf=bridge_course2022_2023
पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-
- सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
- मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.
- सदर कृतीपत्रिका ( worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात. ५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
- सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
- सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.
वरील प्रमाणे सदर सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आपल्याला सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला करावयाची आहे जेणेकरून आपले सर्व विद्यार्थी हे योग्य त्या अध्ययन पातळीपर्यंत पोहोचतील व पुढील अभ्यासक्रम त्यांना समजण्यास सोपे जाईल असा या सेतू अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू आहे.आपल्याला विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानामध्ये आणि त्यांना ज्ञानग्रहण करायचे आहे यामध्ये एक ब्रिज निर्माण करायचे आणि हे ब्रिज निर्माण करण्याचं काम आपल्याला 'सेतू अभ्यासक्रम' करून देणार आहे म्हणून सर्वांनी सदर अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये करणे अपेक्षित आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
धन्यवाद!!
@Rudra Tech