आपल्या मुलांना
उन्हाळ्यामध्ये कुठेतरी विरंगुळाची संधी उपलब्ध व्हावी व त्यांना निसर्गाच्या
सानिध्यामध्ये जाऊन काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यास मिळाव्यात या उद्देशाने अनेक
पालक आपल्या मुलांसोबत या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी
देत असतात.
हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आज रविवारी
संकट चतुर्थीच्या दिवशी आम्ही सुद्धा मुलांना काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यास
मिळाव्यात, त्यांना नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी चिखलदरा
या विदर्भातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या, अमरावती जिल्ह्या tuतील पर्यटन स्थळाला भेट
देण्याचा निश्चय केला व त्यानुसार सकाळपासूनच सर्व मुले व आम्ही आजच्या या चिखलदरा
पर्यटन स्थळाचा आनंद लुटण्यासाठी आतुर झालो होतो त्यामुळे सकाळीसकाळी रुद्र, दक्ष,
अद्वैत, माही व आम्ही चिखलदरा टूरची तयारी करू लागलो. चिखलदरा हे आमच्या
जिल्ह्यातील व आमच्याच तालुका असल्यामुळे
फार जास्त लांब जाण्याची गरज नव्हती.
चिखलदरा या पर्यटन स्थळाला भेट
देण्यासाठी खूप लांबून पर्यटक या ठिकाणी येत असतात, परंतु आमच्यासाठी हे अत्यंत
जवळचे ठिकाण आहे कारण ते आमच्याच तालुक्याचे ठिकाण आहे परंतु म्हणतात ना की, जे
आपल्या जवळ असतं त्याचे महत्त्व आपल्याला नसतं आणि म्हणून आपण लांबच्या एखाद्या
ठिकाणी पर्यटनासाठी जातो परंतु आपल्या जवळच्या ठिकाणी जाण्याचं मुद्दाम टाळत असतो
कारण आपण लहानाचे मोठे त्या ठिकाणी झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणाचे आकर्षण एवढे नसते.
परंतु आमचं तर ठरलं होत आज जायचं तर
चिखलदरा. चिखलदरा येथील आमझरी (गावाचे नाव) या ठिकाणी असणाऱ्या रोपवे, सायकलिंग आणि तेथील नैसर्गिक
दृश्य बघण्यासाठी जाण्याचा ठरवलं व संध्याकाळच्या वेळेस वैराट या चिखलदरा भागातील
जंगलातील सफारीचं नियोजन करून परतवाडा वरून जवळपास बारा वाजता आम्ही चिखलदरासाठी
निघालो. सर्व मुलं उत्साही होते, परतवाडा या ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला होता
परंतु आज नशिबाने थोडसं ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला रोजच्या पेक्षा थोडी कमी
ऊन जाणवत होती. गाडीत पेट्रोल भरून आम्ही चिखलदराच्या मार्गाने निघालो. परतवाडा
वरून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर चिखलदरा हे
ठिकाण आहे.घाट वळणाचा रस्ता असल्यामुळे गाडी जपूनच चालवावी लागते. त्यामुळे
व्यवस्थित काळजीपूर्वक गाडी चालवत आम्ही चिखलदराला जाण्यासाठी निघालो. चिखलदरा हे
ठिकाण पर्यटना बरोबरच या ठिकाणी मिळणाऱ्या शुद्ध दूध, रबडी, कलाकंद यासाठी सुद्धा
प्रसिद्ध आहे. त्यामुळे निघतानांच मुलांनी आग्रह केला की, आपण मडकी (गावाचे
नाव) या ठिकाणी रबडीचा आस्वाद घेऊ आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही
शुद्ध दुधापासून बनलेल्या अत्यंत चविष्ट अशा रबडीचा आस्वाद घेतला आणि तिथून आम्ही
आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो.
चिखलदऱ्याला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आमझरी (गावाचे
नाव) या ठिकाणी जाऊन तेथे असणाऱ्या निसर्गसौंदर्याचा त्याचबरोबर रोपवे, सायकलिंग, इतर
खेळांचा आनंद घ्यायचा आम्ही ठरवलं. आमझरी (गावाचे नाव) या ठिकाणी गावातील
वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून व वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी
नैसर्गिक सौंदर्याचा लाभ पर्यटकांना भेटावं म्हणून त्या ठिकाणच्या आंब्याच्या
वनांमध्ये वसलेल्या नैसर्गिक स्थळाला येथील लोकांनी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित
केलेले आहे आणि त्याचा दृश्य आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं तिथं गेल्यानंतर मुलांसाठी
खेळण्याच्या खूप सार्या गोष्टी उपलब्ध आहेत. जसे- घसरगुंडी, झोके, रोपवे, सायकल
अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी अत्यंत थरारक
अशा रोपवेचा आनंद घेतला त्याचबरोबर मुलं मनसोक्त आमझरीच्या उद्यानामध्ये खेळत होती,
त्याच्यानंतर आम्हाला चार वाजेच्या दरम्यान जंगल सफारीला जायचं होतं त्याच्यामुळे
आम्ही आमझरी येथील उद्यानातील सर्व गोष्टींचा आनंद घेऊन परत चिखलदराकडे वापस फिरलो
कारण दुपारच्या चार वाजल्यानंतर जंगलातील सफारी बंद होत असते. त्यानुसार मग आम्ही
वन विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन आमची सगळी नोंदणी करून आम्ही जंगल सफारीसाठी निघलो. सगळ्यांच्या
मनात होतं की, आपल्याला आज तरी मेळघाटातील प्रसिद्ध अशा मेळघाट टायगरचे
दर्शन व्हावे. कारण मेळघाटामध्ये जवळपास 70 ते
80 वाघ आहेत असं वनविभाग सातत्याने म्हणत असतं आणि बऱ्याच
लोकांना मेळघाट मधील वाघ दिसत सुद्धा असतो परंतु आम्ही मेळघाटमध्ये एवढी वर्षे राहूनसुद्धा
आजपर्यंत आमच्या नशिबी मेळघाटातील वाघाला बघण्याचे भाग्य लाभले नाही. त्यामुळे
ज्या ज्या वेळेस या जंगलाच्या मार्गातून
जात असतो त्या त्यावेळेस मनात कुठे ना कुठे येत असतं की, आज तरी आपल्याला आपलं
मेळघाट टायगरचे दर्शन व्हावे.
अशीच काही मनोमन इच्छा ठेवून आम्ही दुपारच्या चारच्या दरम्यान जंगल
सफारीसाठी वन विभागाच्या माध्यमातून जिप्सी या गाडीतून सफारीला निघालो.
आमच्यासोबत श्री.वानखडे नावाचे गाईड सुद्धा गाडीमध्ये बसले होते. त्यांनी
आम्हाला जंगलामध्ये फिरत असतांना कोण-कोणती काळजी घ्यायची या सगळ्या बाबतीत योग्य
माहिती दिली व जंगलामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात या
संदर्भात संपूर्ण माहिती दिली. आणि आमचा पुढचा मार्ग सुरु झाला, वन विभागाचं
प्रशिक्षण स्थळ ओलांडल्यानंतर खास आम्ही जंगलामध्ये शिरलो, निसर्गाचे सौंदर्य काय
असतं हे आम्हाला या जंगल सफारी मध्ये पावलोपावली जाणवत होतं, रस्त्याने जात असतांना
जंगलातील अनेक प्राणी आम्हाला बघायला मिळाले. त्यामध्ये बार्किंग डियर, कोल्हा,
सांभर, मोर, जंगली कोंबड्या असे अनेक प्राणी, पक्षी आम्हाला पुढ-पुढे जात असतांना
दिसत होत्या. सर्व मुले ह्या सर्व प्राण्यांना बघून आनंदित होत होते व ह्या सर्व
प्राण्यांना आम्ही आमच्या मोबाईल फोनच्या कॅमेरा मध्ये कैद करत होतो, परंतु
सगळ्यांच्या मनात मेळघाट टायगर दिसावं अशी इच्छा होती, आपल्या नशिबात वाघाचे
दर्शन असेल तर नक्कीच आपल्याला आज आपल्या मेळघाट टायगर चे दर्शन होईल, असं विचार
करून जंगल सफारीचा आनंद घेत होतो. मेळघाट येथील जंगल हे दऱ्याखोरांमध्ये वसलेलं
घनदाट, अनेक प्राण्यांचे अधिवास असलेलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं ठिकाण आहे या
ठिकाणी या घनदाट जंगलाचं नैसर्गिक सौंदर्य तसेच चिखलदऱ्यातील अनेक पॉईंटचे सौंदर्य
आपल्या नजरेमध्ये, आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अनेक पर्यटक या
ठिकाणी येत असतात.
आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या या दोन ते तीन
तासाच्या जंगल सफारीच्या प्रवासामध्ये अनेक खोल दऱ्या, आंब्याचे, जांभळाचे व इतर
अनेक घनदाट वृक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघायला मिळाले. आम्ही वैराट देवीच्या
जंगलामध्ये जाऊन आमच्या परतीच्या प्रवासाला लागण्याच्या तयारीत होतो. परतीच्या
प्रवासाला येत असतांना आमच्या जिप्सीतील मागच्या सीटवर बसलेल्या आमच्या रुद्रला
अचानक टायगरचं दर्शन झालं आणि रुद्रने आम्हा सगळ्यांना गाडी थांबवायला सांगितले व
आमच्या जिप्सीच्या ड्रायव्हरने लगेच गाडी थांबवली. व आम्ही सगळे बघतो तर काय
साक्षात खाली दरीमध्ये एका छोट्या मैदानासारख्या जागेवर एक वाघ आम्हाला मस्त
गवतावर लोळतांना दिसलं, आम्ही सगळे एकदम शांततेने त्या वाघाकडे बघत होतो कारण
मेळघाट मधील वाघ हे थोडं जरी आवाज किंवा काही कुजबुज झाली तर पटकन घनदाट
जंगलामध्ये गायब होतात त्यामुळे अत्यंत शांतपणे आम्ही सगळेजण आमच्या जिप्सी मध्ये
बसूनच कोणी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये तर कोणी आपल्या सोबत आणलेल्या मोठ्या
कॅमेरामध्ये त्या मनसोक्त मैदानावर लोळणाऱ्या वाघाचे फोटो काढत होतो, आणि आजच्या आपल्या
या जंगल सफरीच फलित झालं असं मनोमन वाटत होतं, तेवढ्यात त्या ठिकाणी एक अजून छोटं
पिल्लू आलं आणि ते सुद्धा आपल्या आई सोबत गवतामध्ये लोळायला लागलं.
अशाप्रकारे आज आम्ही जवळपास अर्धा
तास त्या कब आणि त्याच्या आईला बघत होतो, अतिशय सुंदर असा तो नजारा होता. मुलांचा
उत्साह तर गगनात मावेनासा झाला होता. मुलांना खूप भारी वाटत होतं. मुलं दिवसभर
खेळून खेळून दमलेली असतांना शेवटच्या पर्यटनाच्या संपण्याच्या किंवा परतीच्या मार्गावर
दिसलेल्या या मेळघाट टायगरमुळे मुलं तहान-भूक विसरून आपल्या नजरेमध्ये हा
आनंदाचा क्षण सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते. जवळपास तीस मिनिटं अत्यंत शांतपणे
या कब व वाघीणीला बघितल्यानंतर आम्ही जंगल सफारीतून बाहेर निघालो व तिथून मग आम्ही
चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला बाय बाय करून परतवाडासाठी परत निघालो.
परतवाडा येथे पोहचल्यावर आम्ही ब्रम्हांडनायक
नावाच्या अत्यंत नावाजलेल्या व सात्विक जेवण मिळणाऱ्या हॉटेलवर सर्वांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेऊन आपल्या आजच्या पर्यटनाच फलित झालं असं समाधान व्यक्त करून आम्ही घरी
पोहोचलो.
अशाप्रकारे आजचा दिवस खूपच मजेत व
आनंदात गेला, विशेष करून मेळघाट टायगरचं दर्शन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने
आमच्या आजच्या या जंगल सफारीचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
धन्यवाद.
@RudraTech
Nice information
ReplyDelete