शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील पहिला मेळावा आयोजन करणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील पहिला मेळावा आयोजन करणे.
जुन २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान / उपक्रम अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यस्तर संसाधन गटाचे प्रशिक्षण तसेच विभागस्तर, तालुकास्तर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व केंद्र स्तरावरील शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. उपक्रमाच्या पुढील टप्यावर शाळास्तरावरील शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ चे आयोजन करावयाचे आहे. सदरील शाळा स्तरावरील पहिल्या मेळाव्याचे आयोजन दि. ११ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत करण्यात यावे. या कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी जिल्ह्यातील सर्व जि.प., म.न.पा., व न.पा. शाळांमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे :
१. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी-म.न.पा. व न.पा. व ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणे बाबतचे नियोजन शाळांना व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना कळवावे.
२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.
३. मेळावा आयोजन करीत असताना मेळाव्याबावत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी. व त्यामाध्यमातून पुढील वर्षी जून २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दखलपात्र असलेल्या सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे.
४. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत.
१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),
२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),
३) बौद्धिक विकास,
४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,
५) भाषा विकास,
६) गणनपूर्व तयारी,
७) पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन
या प्रमाणे स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर केल्या जातील व बालकांची शाळापूर्व तयारी घरी करून घेण्यासाठी शाळापूर्व तयारीचे साहित्य सातव्या स्टॉलवर पालकांना वितरीत करण्यात येईल.
५. बालकांच्या शाळापूर्व तयारीसाठी पालकांना वितरीत करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे मेळावा क्रमांक १ ते मेळावा क्रमांक २ च्या दरम्यान साधारणपणे ८ ते १० आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी घरी करून घ्यायची आहे. या करिता प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक हे पालकांना सहाय्य करतील.
६. मेळावा आयोजनासंदर्भातील सांख्यिकी माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी येथे क्लिक करा
या लिंकवर भरावी.
७. शाळापूर्व तयारी अभियानासाठी सहकार्य करणारे स्थानिक शिक्षित मुले / मुली (किमान ५ स्वयंसेवक) यांची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी येथे क्लिक करा या लिंकवर भरावी.
८. शाळा स्तरावरील मेळाव्यामध्ये बालके व पालकांना वितरित करावयाचे साहित्य वितरित करण्यात आले आहे. मेळावा आयोजनापूर्वी उपक्रमाचे साहित्य तालुका स्तराहून केंद्रावर व तेथून सर्व शाळांना वितरीत झाल्याची खात्री प्राधान्याने करण्यात यावी.
९. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan2022 #शाळापूर्वतयारी अभियान 2022 व #ShalapurvaTayari2022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.
१०. जून २०२२ मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये बालकांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक २ चे आयोजन करण्यात यावे. किंवा शाळा सुरु झाल्यावर पहिल्या आठवड्यात शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. २ चे आयोजन करता येवू शकेल. त्या अनुषंगाने आवश्यक सविस्तर सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
वरील प्रमाणे शाळा स्तरावर पहिल्या मेळाव्याचे नियोजन व आयोजन करण्यात यावे.